जुगाराच्या व्यसनाने महिलेने घरातच मारला डल्ला, एलसीबीने केली गुन्ह्याची उकल

महा पोलीस न्यूज । दि.१३ जून २०२५ । व्यसन कोणतेही असो त्यात आजवर कुणाचा उद्धार झाल्याचे कधी ऐकण्यास मिळाले नाही मात्र व्यसनामुळे रसातळाला जाणारेच नेहमी समोर येतात. भुसावळ येथे असाच एक प्रकार एका महिलेच्या बाबतीत समोर आला आहे. जुगाराच्या व्यसनातून कर्जबाजारी झालेल्या महिलेने आपल्याच घरातील रोकड जुगारात हरल्यामुळे घरात चोरी झाल्याचा बनाव केला. पोलिसांनी शोध घेतला मात्र काहीही सुगावा लागला नाही. अखेर जळगाव एलसीबीच्या पथकाने माहिती घेऊन गुन्हा उघड केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील नॉर्थ कॉलनी भागात दि.१० जून रोजी दुपारच्या सुमारास एका घरात घरफोडी करीत मोठ्याप्रमाणात चोरट्यांनी रोकड आणि दागिने चोरी झाल्याचा गुन्हा भुसावळ शहर पोलिसात दाखल झाला होता. घटनेची माहिती घेण्यासाठी जळगाव एलसीबीचे पथक त्याठिकाणी पोहचले असता गुन्हा घडलेल्या घराच्या शेजारील घर गेल्या १० दिवसापासून बंद असताना देखील त्याठिकाणी चोरी झालेली नव्हती तसेच फिर्यादीच्या घराचे कुलूप देखील तुटलेले नसल्याचे पथकाच्या लक्षात आले.
महिलेला होती जुगाराची सवय
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिर्यादीचे घरातील लोकांना घरफोडीबाबत सखोल विचारपुस केली असता, फिर्यादीची आई नामे शर्मीला चंद्रमनी शिंदे यांना काही दिवसापूर्वी जुगार खेळण्याची सवय जडल्याचे समोर आले. घरातील रोख रुपये व सावकाराकडून घेतलेले पैसे हे जुगारात हरल्याने ते पुन्हा जुगार खेळून जिंकण्याच्या अमिषाने तीने घरात कोणास काहीएक न सांगता त्यांनी त्यांचे घरातील त्यांचे व त्यांच्या आईचे सोन्या-चांदीचे दागिने हे त्यांनी बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह बँक शाखा, भुसावळ येथे तारण ठेवून त्यावर गोल्ड लोन घेवून ते पैसे जुगारात आईच्या आजारपणात तसेच घर खर्चात खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही रोख रक्कम सुध्दा त्यांनी जुगारात खेळण्यासाठी वापल्याचे सांगितले.
गोल्ड लोनच्या पावत्या हस्तगत
शर्मिला शिंदे यांनी घरफोडी झाल्याचा बनाव करुन फिर्यादी चेतन चंद्रमनी शिंदे यांना सांगितल्याने त्यांनी याबाबत भुसावळ शहर पो.स्टे.ला फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्मीला चंद्रमनी शिंदे यांनी बँकेत तारण ठेवलेले सोन्या-चांदीच्या दागिन्याच्या पावत्या बँकेकडून प्राप्त करण्यात आलेल्या आहेत. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्यांचे तपास स्त्रोत वापरुन चौकस बुध्दी वापरुन गुन्हयातील संशयित आरोपी शर्मीला चंद्रमनी शिंदे, वय-४९, रा.आर.बी.-२/९५२, नॉर्थ कॉलणी एरीया लिम्पस क्लब भुसावळ हिस निष्पन्न केले आहे.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पो.उप.निरी.श्री.शरद बागल, सहाफौ. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. संदिप चव्हाण व चा.पो.कॉ. महेश सोमवंशी यांनी केली आहे.