मोटरसायकल चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना LCB कडून अटक

मोटरसायकल चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना LCB कडून अटक
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातून चोरीला गेलेल्या मोटरसायकलप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने तातडीने कारवाई करत दोघा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. सदर घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दि. २४ मे २०२५ रोजी नईम खान मुकीम खान (रा. हुडको पिंप्राळा, जळगाव) यांची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 206/2025 भादंवि कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान, LCB पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अझरूद्दीन सलीम शेख (वय १९, रा. पिंप्राळा हुडको, सध्या मुक्काम पाळधी ता. धरणगाव) हा सदर चोरीत सहभागी होता.
या माहितीच्या आधारे दिनांक ६ जून २०२५ रोजी LCB पथकाने अझरूद्दीन यास अटक केली. प्राथमिक चौकशीत त्याने अब्रार हमीद खाटीक (वय २०, रा. उमर कॉलनी, उस्मानिया पार्क, जळगाव) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. अब्रार यास जेलमधून सुटल्यानंतर तातडीने ताब्यात घेण्यात आले असून, दोघांनाही मुद्देमालासह रामानंदनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक शरद बागल, पो.ह. हरिलाल पाटील, प्रवीण भालेराव व रवींद्र कापडणे यांनी केली.
गुन्हेगार हे सराईत व संघटित गुन्हेगारी करणारे असून, त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रेवानंद साळुंखे करीत आहेत.