उद्योजकांवरील हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करा – युवासेनेची मागणी

उद्योजकांवरील हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करा – युवासेनेची मागणी
जळगाव प्रतिनिधी एम.आय.डी.सी. परिसरातील उद्योजकाला रिक्षेने पाठलाग करत कार अडवून चौघांनी हल्ला करून जखमी केले. ही घटना बुधवारी रात्री ९.३० वाजता रेमंड चौकात घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. उद्योजक संजय रामगोपाल तापडिया हे बुधवारी रात्री कंपनीतून घरी परतत असताना अज्ञात रिक्षाचालकाने त्यांच्या कारचा (एम.एच. १९ ई.पी. १८१०) पाठलाग केला. हे लक्षात आल्याने तापडीया यांनी रस्ता बदलवला तरी रिक्षाचालकाने त्यांच्या कारला अडवून रिक्षेतील चार ते पाच जणांनी लाथांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस टणक वस्तूने मारहाण केल्याने तीन टाके पडले आहेत. याबाबत गुरुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराक्रुिद्ध गुन्हा दाखल झाला.
उद्योजक यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेने तर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनजी गणापुरे यांना देण्यात आले.
या वेळी युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा प्रमुख प्रीतम शिंदे, गौरव चंदनकर, खुशल शर्मा, आकिब शेख, कार्तिक खैरनार, ओम खचणे आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
तदनंतर संजय तापडिया यांची त्यांच्या निवास्थानी युवासेना पदाधिकारी यांनी भेट घेतली.या वेळी दूरध्वनीद्वारे माजी मंत्री सुरेशदादा जैन तसेच शिवसेना उपनेते तथा जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख.संजय सावंत यांनी तापडिया यांच्या आरोग्याविषयी चर्चा केली.






